www.rayatdrkrmore.blogspot.com या शैक्षणिक ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत…! डॉ.केशव रामभाऊ मोरे,सहाय्यक प्राध्यापक,रयत शिक्षण संस्थेचे,आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन,सातारा.

Tuesday, 29 April 2025

प्रा. डॉ. धनवडे सरांना सेवानिवृत्ती निमित्त शुभेच्छा !!!

आपले एक ज्येष्ठ सहकारी प्रा. डॉ. नंदकुमार धनवडे सर ३० एप्रिल २०२५ रोजी नियत वयोमानानुसार आपल्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्याबद्दल आपण काही लिहावे याबद्दल विचारांचा कल्लोळ मनामध्ये निर्माण झाला आणि मी त्यांच्याबद्दलच्या भावना शब्दबद्ध करीत गेलो.

आनंदी, उत्साही, आणि प्रसन्न मुद्रेचे सर हे विद्यार्थीप्रिय आणि प्रेरणादायी प्राध्यापक आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर सतत हास्य असते, ज्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्यासोबत शिकताना आनंद मिळतो. ते प्रत्येक विद्यार्थ्यांशी आपुलकीने वागतात.  त्यांची शिकवण्याची पद्धत अनोखी आणि ऊर्जावान असते. कठीण विषयही सोप्या आणि रंजक  पद्धतीने समजावून सांगण्याची त्यांची हातोटी वाखाणण्याजोगी आहे. वर्गात शिकवताना त्यांचा आवाज ऊर्जेने भरलेला असतो. हातवारे आणि हावभाव यामुळे त्यांच्या शिकवण्यात अधिक प्रभाव पडतो.

विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना प्रोत्साहन देणे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. ते फक्त अभ्यासापुरते मर्यादित न राहता, विद्यार्थ्यांना जीवनातील मूल्ये शिकवतात. त्यांच्या उपस्थितीत नेहमी सकारात्मक ऊर्जा असते आणि त्यांच्याशी संवाद साधताना कोणालाही आत्मविश्वास आणि आनंद मिळतो.

"वर्गात मुलं आपापसात बोलत असतील, तरी धनवडे सर कोणताही आवाज न करता फक्त शांतपणे त्यांच्याकडे पाहतात. त्यांच्या त्या गंभीर आणि संयमित नजरेचा इतका प्रभाव असतो की क्षणातच वर्गात शांतता पसरते. विद्यार्थ्यांच्या वर्तनावर प्रभाव टाकण्याची त्यांची ही पद्धत फारच प्रभावी आणि आदर्श आहे."

एखाद्या व्यक्तीबद्दल, एखाद्या विषयावर मत व्यक्त करताना ते कोणताही निर्णय घाईघाईने घेत नाहीत; विचारपूर्वक, सर्व पैलूंचा विचार करूनच आपलं मत मांडतात. त्यांची ही समजूतदार व विचारशील वृत्ती त्यांच्या परिपक्वतेचं दर्शन घडवते."

सरांमध्ये मला काही वैशिष्ट्ये दिसून आली. त्याचा उल्लेख इथे मला आवर्जून करावासा वाटतो.  संवादकौशल्य, सहकार्यशील वृत्ती, संयम आणि सहनशीलता, समस्या सोडविण्याची क्षमता, संघभावना, नवोपक्रमशीलता, उत्तम श्रोता, संवेदनशीलता इ. वैशिष्ट्यांचा उल्लेख करावा लागेल.

शिक्षक हा केवळ ज्ञान देणारा नसतो, तर तो विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणास्रोतही असतो. काही शिक्षक आपल्या ऊर्जा, शिस्त आणि कामाच्या निष्ठेमुळे विद्यार्थ्यांच्या मनात कायमस्वरूपी स्थान निर्माण करतात. अशाच अखंड ऊर्जा आणि करारी बाण्याचे प्रतीक म्हणजे धनवडे सर. सरांची एक विशेष गोष्ट म्हणजे त्यांना कधीही कंटाळा येत नाही. सर २००० सालापासून ते आतापर्यंत दररोज विटा ते सातारा प्रवास करतात. पण त्यांच्या चेहऱ्यावर कधीही कंटाळा दिसून येत नाही.  ते नेहमी वर्गात आणि वर्गाबाहेर उत्साही आणि प्रसन्न असतात. त्यांनी कधीही जांभई दिल्याचे मी पाहिले नाही.  

कामाचा प्रचंड उरक असणारी व्यक्ती म्हणजे धनवडे सर. अशा व्यक्ती म्हणजे खरंतर इतरांच्या प्रेरणास्त्रोत असतात. त्यांची ऊर्जा, निष्ठा आणि सातत्य यामुळे आजूबाजूच्या लोकांचाही कामातील उत्साह वाढतो.

शिवाजी विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विद्याशाखेत एक बुजुर्ग, परिपक्व आणि ज्ञानाने समृद्ध असे व्यक्तिमत्त्व म्हणजे धनवडे सर. सर हे केवळ एक शिक्षक नसून एक मार्गदर्शक, विचारवंत आणि विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्रोत आहेत. त्यांचा शांत स्वभाव, मृदू आवाज, मुद्देसूद बोलणे आणि प्रत्येक गोष्टीकडे शिस्तबद्धपणे पाहण्याची सवय विद्यार्थ्यांमध्ये अनुशासन निर्माण करते.  शिक्षणक्षेत्रातील त्यांचा दृष्टीकोन केवळ पुस्तकापुरता मर्यादित नसून, तो जीवनमूल्यांशी जोडलेला आहे. ‘शिक्षक हा समाज परिवर्तनाचा वाहक असतो’ हे त्यांनी त्यांच्या कृतीतून सिद्ध केले आहे. 

त्यांचा कामाचा उरक, वेळेचं भान आणि विद्यार्थ्यांविषयीची आत्मीयता यामुळे संपूर्ण विद्यापीठात त्यांचं नाव अत्यंत आदराने घेतलं जातं. त्यांनी शिकवलेली प्रत्येक गोष्ट ही आजही विद्यार्थ्यांच्या विचारविश्वाचा भाग बनलेली आहे. अशा या ज्ञानवंत, संयमी आणि दूरदृष्टी असलेल्या व्यक्तिमत्त्वास आझाद कॉलेजमधील प्रत्येकाने मन:पूर्वक सलाम केला आहे आणि करत राहील. सर आपणांस सेवानिवृत्तीच्या आझाद परिवाराच्या वतीने मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा!!! सर आपणास सेवानिवृत्तीनंतर उत्तम आरोग्य लाभो, आपल्या सर्व इच्छा, आकांक्षा पूर्ण होवोत ही ईश्वर चरणी प्रार्थना.  

डॉ. केशव मोरे, प्राध्यापक, आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन, सातारा